लोकमत न्यूज नेटवर्क जालना/छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सरकार काही निर्णय घेत नसल्याचे म्हणत अंगावर पेट्रोल टाकून १८ वर्षीय तरुणाने पेटवून घेतल्याची घटना बुधवारी सकाळी पाथरवाला बुद्रूक (ता. अंबड, जि. जालना) येथे घडली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईदेखील गंभीररीत्या भाजली. दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगल गणेश जाधव आणि सूरज गणेश जाधव असे भाजलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. मंगल जाधव या ३५ टक्के भाजल्या असून, सूरज ६० टक्के भाजला आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी दिली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडील गणेश जाधव यांचे कपडे जळाले. सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचाराची सोय करावी, अशी मागणी सूरजचे मामा मुरलीधर खरात यांनी केली आहे.
३ महिन्यांपासून आंदोलनात सहभाग सूरज हा गेल्या ३ महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी आहे. गावात चार दिवस उपोषणही केले. त्याला दहावीला ७४ टक्के गुण मिळाले. शासकीय आयटीआयला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे खासगी आयटीआयला प्रवेश घेतला. मात्र, त्यासाठी शुल्क भरणे अवघड होते. सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेत नसल्याने तो नाराज होता.