जालना : नव्याने कोरोनाचे रुग्ण वाढल्यास शिथिल केलेले निर्बंध कडक करावे लागतील. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे सोमवारी दिली.
राज्यातील काही शहरांमध्ये नव्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. ही बाब गंभीर असून, दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये दुसरी लाट आली आहे. ही लाट महाराष्ट्रात आल्यास परिस्थिती गंभीर बनू शकते; परंतु या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने आवश्यक ती खबरदारी यापूर्वी घेतली आहे. तशा सूचनाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लग्न समारंभ असो किंवा शाळा सुरू करण्याचा निर्णय असो हे निर्णय रुग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे घेतले; पण भविष्यात हे शिथिल केलेले निर्बंध आणखी कडक केले जातील. लॉकडाऊनबाबत अद्याप निर्णय झाला नाही. या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही टोपे यांनी सांगितले.