लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : शेतकऱ्यांनी शेतातील बांध हे पडीक न ठेवता तिथे फळझाडे लावणे आवश्यक आहे. या फळझाडांपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर मिळेल. यातूनच शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत विभागीय वनसंरक्षक अधिकारी नितीन गुदगे यांनी व्यक्त केले.अंबड तालुक्यातील सौंदलगाव येथे सामाजिक वनीकरण आणि महाराष्ट्र ग्राम रोजगार हमी योजना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंवाद कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक वनसंरक्षक प्रशांत वरूडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ, वनपाल घुगे, वनरक्षक नाईकवाडे, कासारे, दोडदगावचे सरपंच ज्ञानेश्वर वाघ, ग्रामसेवक चव्हाण, कानिफनाथ सावंत, किसन घायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना गुदगे म्हणाले, रोहयो अंतर्गत शेतक-यांच्या बांधावर आणि शेतजमिनीवर वृक्ष लागवड योजनेची शेतक-यांनी माहिती जाणून घेण्याची गरज आहे. आज शेतकरी हे सामाजिक वनीकरण व रोहयोच्या योजनेपासून वंचित राहत आले आहेत. त्यांनी या सर्व योजनांचा लाभ घेऊन शेतात झाडे लावणे आवश्यक आहे. यात आंबा, चिंच, जांभूळ, सीताफळ, सागवान, बांबू, चंदन, शेवगा या झाडांची लागवड केली पाहिजे. यातून शेतक-यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील.यावेळी रामेश्वर राऊत, बंडू मुंढे, पोपट मुंढे, भीमराव खोमणे, बंकटराव बिलवाळ, अर्जुन राऊत, बाबूराव खोमणे, अजयसिंग राजपूत, अनिल राजपूत, देविदास खोमणे, अशोक राजपूत, लक्ष्मण ऊसारे, लक्ष्मण पवार, भीमसिंग राजपूत, नारायण राजपूत, बाबूराव खोमणे, जयसिंग राजपूत, गणेश शिहिरे यांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी आपले अनुभव विशद केले.
...तर शेतकरी समृद्ध होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 1:30 AM