जालना : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी झालेल्या गारपिटीमुळे नुकसानीचे ४८ तासांत पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात ७२ तास उलटूनही पंचनाम्यास अद्याप सुरुवातही नाही. सरकारने शेतक-यांचा अंत पाहू नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिला. रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी वा-याने राज्यातील मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील शेती पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जालना जिल्ह्यातील जालना व मंठा तालुके गारपिटीमुळे सर्वात जास्त नुकसानग्रस्त झाले आहेत. या तालुक्याचा बुधवारी धनंजय मुंडे यांनी दौरा करून पाहणी केली.अनेक शेतीपिकांचे, फळबागांच्या नुकसानीची माहिती त्यांनी शेतक-यांशी संवाद साधून जाणून घेतली. सरकारने ४८ तासांत पंचनामे करण्याचे जाहीर केले असले तरी ७२ तासा नंतरही पंचनाम्याला सुरूवात झाली नसल्याची तक्रार अनेक शेतक-यांनी मुंडेंशी बोलताना केली. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी १० मिनिटांचा धावता दौरा करताना आमच्या शेतांची साधी पाहणीही न करता पळ काढल्याबद्दलही अनेक शेतक-यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.मुंडे म्हणाले की, आपण शेतक-यांच्या पाठीशी असून, शेतकºयांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारशी संघर्ष करू. निसर्गाने शेतक-यांवर आस्मानी तर सरकारने सुलतानी संकट आणले आहे. शेतक-यांचा अंत पाहू नका. आज पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतक-यांना आधार न दिल्यास ते उद्ध्वस्त होतील, अशी भीती व्यक्त केली. किती क्षेत्रावर कोणते नुकसान झाले आहे. याचे आकडे सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचनामे, बैठका आणि आढावा यांचा फार्स न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्यासमवेत पंकज बोराडे, निसार देशमुख, बबलू चौधरी, बळीराम कडपे, अॅड.संजय काळबांडे आदी उपस्थित होते.
७२ तासांनंतरही पंचनामे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:40 AM