जालना : मागील काही दिवसांपासून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात मागील आठ दि्वसात ३ हजार १२० जणांना ई-पास देण्यात आले आहेत. यात बहुतांश जणांनी रूग्णालय व अंत्यसंस्काराला जायचे आहे, अशी कारणे दिली आहेत.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या काळात आंतरजिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ज्याला महत्त्वाचे काम आहे, त्या व्यक्तीला ई-पासमार्फत प्रवेश दिला जात आहे. जालना जिल्ह्यात २५ चेकपोस्ट उभारण्यात आली आहेत. या चेकपोस्टवर जवळपास ७५ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तीकडे पास आहे, त्यांनाच प्रवेश दिला जात आहे. जालना जिल्ह्यातून आतापर्यंत ३ हजार १२० जणांना पास देण्यात आले आहेत. पास काढण्यासाठी नागरिकांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत. यात प्रामुख्याने अंत्यसंस्कारासाठी चाललो आहे किंवा रूग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचं आहे, अशी कारणे देण्यात आली आहे.
ही कागदपत्रे हवीत
ई-पाससाठी जिल्हा पोलीस दलाकडून प्रसिध्द केलेल्या संकेतस्थळावर दररोज मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. मात्र, बहुतांश अर्जदार केवळ माहिती भरून अर्ज सबमिट करतात. त्यासाठी आवश्यक कारण काय आहे, हे नमूद करत नाहीत. तसेच अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रेही अपलोड करत नाहीत. त्यामुळे अशा ई-पासला मंजुरी दिली जात नाही. नागरिकांनी प्रवासाचे योग्य कारण दिले व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड केल्यास सायबर विभागाकडून परवानगी दिली जाते.
असा करावा अर्ज
पोलीस प्रशासनाने दिलेल्या वेबसाईटवर जाऊन स्वत:ची माहिती, फोटो व ज्या कामाच्या संदर्भातील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे, ती माहिती, कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदाराला सांकेतिक क्रमांक प्राप्त होतो. हा सांकेतिक क्रमांक पुन्हा वेबसाईटवर टाकल्यास ई-पासला परवानगी दिली असेल तर पास डाऊनलोड करून घेता येतो.
दोन ते अडीच मिळतो ई-पास
नागरिकांना ई-पास देण्याची जबाबदारी सायबर विभागाकडे आहे. त्याठिकाणी दोन कर्मचाऱ्यांना यासाठी नेमण्यात आले आहे. हे कर्मचारी अर्जाची तपासणी करून पासला परवानगी देतात. नागरिकांनी अर्जात ठेवलेल्या त्रुटींची पाहणी ते ई-पासला परवानगी अशाप्रकारे काम करतात.