लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम वर्षभरापासून रखडले आहे. जुनी आसन व्यवस्था तोडल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. बसस्थानकाची ही दुरवस्था जबाबदार अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा सवाल संतप्त प्रवाशांमधून केला जात आहे.जालना बसस्थानकाच्या तूतनीकरणासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेले नूतनीकरणाचे काम सुरुवातीपासूनच संथ गतीने सुरू आहे. नूतनीकरणाच्या कामासाठी जुने बांधकाम पूर्णत: तोडण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी वर्ष उलटूनही नवीन कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे बसस्थानकात सर्वत्र धूळ उडत आहे. बसायलाच जागा नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव वाळूवर बसावे लागते आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच भिंतींनाही तडे गेले आहेत. येथील रस्त्यांची चाळणी झाल्यामुळे बस आगारात आल्यावर सर्व धूळ प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. योग्य सुविधा नसल्याने प्रवाशी बसस्थानक परिसरात उघड्यावरच प्रवाशी लघुशंका करत आहेत. चौकशी कक्ष नावालाच आहे. हिरकणी कक्षाला टाळे लागले आहे. तर पोलीस चौकी बेवारस आहे. रात्रीच्या वेळी स्थानकातील हायमॉस्ट बंद असतो. त्यामुळे मागील बाजूस सर्वत्र अंधार असतो. अंधाराचा फायदा घेत स्थानक परिसरात भामट्यांचा वावर वाढला आहे. बसमध्ये चढताना महिला प्रवाशांचे दागिने व पर्स चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहे. तर वाहक-चालकांसाठीच्या विश्राम कक्षात अस्वच्छतेमुळे उभे राहणे कठीण होत आहे. मात्र, नाईलाजास्तव वाहक-चालकांना येथे मुक्कामी थांबावे लागत आहे. एकंदरीत बसस्थानकाचा उकिरडा होत असताना अधिका-यांचे याकडे लक्ष जात नाही का, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
बसस्थानकात समस्यांना नाही तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:16 AM