लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणावर चर्चेतून मार्ग निघणे गरजेचे आहे. त्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आपण करू, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खा. अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे-पाटील यांना दिली. खा. चव्हाण यांनी शनिवारी रात्री उशिरा अंतरवाली सराटी येथे जरांगे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. शनिवारी रात्री ११:३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही चर्चा चालली.
चव्हाण यांनी सांगितले की, मी आज शासनाचा प्रतिनिधी म्हणून नाही, तर समाजबांधव म्हणून जरांगे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. समाजाच्या आरक्षणासाठी चर्चा करून समन्वयातून मार्ग काढणे गरजेचे आहे. सगेसोयरे अध्यादेशावर हरकती आल्या आहेत. शनिवारी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे त्यावरील प्रक्रिया किती पूर्ण होईल हे आताच सांगता येत नाही.
सगेसोयऱ्याची मागणी मान्य होणार?
गेल्या काही दिवसांपासून जरांगे-पाटील यांचा सूर हा महायुतीच्या विरोधातील आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात हा सूर आणखी तीव्र होण्याची शक्यता गृहीत धरून अशोक चव्हाण जरांगे-पाटील यांना भेटल्याचे दिसते. जरांगे-पाटील यांच्या सगेसोयऱ्यांबद्दल असलेल्या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार महिन्यांत अधिसूचना जारी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे.
२४ तारखेला समाजाची बैठक
- सरकारने फसवणूक केल्याचे आपण अशोक चव्हाण यांना सांगितले आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी नाही. गुन्हे मागे घ्यायचे सोडून अधिक गुन्हे दाखल केले जात आहेत. हैदराबादचे गॅझेट्स घेतले नाही.
- यासह समाजाच्या मागण्या, प्रश्न, शासनाकडून होणारी फसवणूक त्यांच्यासमोर मांडली आहेत. ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील. आता आम्ही २४ मार्च रोजी समाजाची बैठक बोलाविली आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.
आरक्षणासाठी दोन तरुणांच्या आत्महत्या
बीड/हिंगोली : मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बीड जिल्ह्यात २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन तर हिंगोली जिल्ह्यात २५ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक (जि. बीड) येथे प्रवीण दिलीप सोनवणे (२९) या तरुणाने मोबाइलवर ‘एक मराठा-लाख मराठा’ असा स्टेटस ठेवून चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. प्रवीण सोनवणे हा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात सहभागी होता.