वडीगोद्री (जि.जालना) : आरक्षणाविना मराठा समाजातील पाच पिढ्या बरबाद झाल्या आहेत. यापुढील पिढ्या बरबाद होऊ देणार नाही. सत्ताधारी, विरोधकांनी कितीही दडपण आणले तरीही आता माघार घेणार नाही, असा इशारा अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचा दौरा करणार असून, त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मेळावा घेणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.
अंतरवाली सराटी येथे शनिवारी जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची विचार मंथन बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत हाेते. त्यांच्याकडे असे कोणतेही हत्यार व शक्ती नाही की त्याचा वापर करून ते मला फोडू शकतील. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा डाव चालणार नाही. सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यांची शान मराठा समाजाने वाढविली आहे. आता कोण नागपूरला जातेय, कोणी कोल्हापूरला जातेय, कोणी पुण्याला जाऊन उचूकन देतेय. कोणी कितीही उचकावले तरी मराठा समाज व ओबीसी समाज वाद घालणार नाही व आम्ही समोरासमोर येणार नाहीत. दिलेल्या मुदतीत शासनाने आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा आमरण उपोषण पुन्हा सुरू केले जाईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला. राज्यातील समाज बांधवांनी शांततेत आंदोलन करावे, कोठेही उद्रेक करू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.
१० ते १२ दिवसांचा दौरामुस्लिम समाजाला आरक्षण दिलं. त्यांना पुरावे कुठं मागतायत. आमच्याकडे गाड्याच्या गाडे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण नाही. दोन दिवसात गुन्हे परत घेतो असे सांगितले होते. परंतु, अद्याप गुन्हे परत घेतलेले नाहीत. यामुळे आता आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करावा लागणार आहे. यासाठी राज्यव्यापी मेळावा घेतला जाणार असून, मेळाव्याला ३५ लाखावर मराठा समाज बांधव येणार आहेत. मेळाव्यासाठी १० ते १२ दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले. साखळी उपोषणाच्या नवव्या दिवशी शनिवारी रेणापुरी गावातील नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.