जालना : शासकीय पॉलिटेक्निकच्या वसतिगृहात मागील आठवडाभरापासून पाणीच उपलब्ध नाही. पाण्याविना विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी एकत्र येत आंदोलन केले.शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे. मात्र, या वसतिगृहात कुठल्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. मात्र, शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव येथे राहावे लागत आहे. तीन मजली वसतिगृहात अडीचशे विद्यार्थ्यांसाठी चार हजार लिटरची एकच पाण्याची टाकी उपलब्ध आहे. या टाकीत आठवड्यातून एकदाच पाणी भरले जाते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना स्नान करण्यासह कपडे धुण्यासह पाणी मिळत नाही. मुलींच्या वसतिगृहातही अशीच स्थिती आहे. मुलांच्या वसतिगृहात आठवडाभरापासून पाणीच उपलब्ध नसल्याने सोमवारी दुपारी विद्यार्थ्यांनी एकत्र येथे मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. प्राचार्य एस. आर. नवले यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यामुळे प्राचार्यांचा नाईलाज झाला. ही माहिती मिळाल्यानंतर माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. वसतिगृहातील पाण्याची समस्या तात्पुरती सोडविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गोरंट्याल यांनी प्राचार्यांशी चर्चा केली. मग विद्यार्थ्यांनी आंदोेलन मागे घेतले.-----------शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील पाण्याचा प्रश्न गत अनेक वर्षांपासून कायम आहे. मागील वर्षी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी वसतिगृहास भेट देऊन येथील पाणीसमस्येसह अन्य अडचणी सोडविण्याचे निर्देश संबंधितांना दिले होते. त्यानंतर काही सुधारणा झाल्या. मात्र, आता परिस्थिती पुन्हा जैसे थे बनली आहे.---------------
तंत्रनिकेतन वसतिगृहात स्नानालाही पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:34 PM