राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, किराणा, पारावर, कट्ट्यावर, बसस्थानक, मंदिरात अशा सार्वजनिक ठिकाणी राजकीय चर्चा रंगत आहेत. रस्त्यावरून येता-जाता ओळखीची व्यक्ती दिसली की, राजकीय विषयालाच हात घातला जात आहे.उन्हाचा पारा चढलेला असताना अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील एका दुकानासमोर मंगळवारी काही ग्रामस्थ राजकीय गप्पांमध्ये रमले. त्यातील पांडुरंग गावडे यांनी निवडणुकीच्या विषयाला हात घातला. त्यांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेवर नाराजी व्यक्त केली. आजपर्यंत अनेक शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित आहेत. मोजक्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून, या कर्जमाफीबद्दल अजूनही खूप काही प्रश्न आहे.चर्चेला पुढे नेत राजेंद्र खटके म्हणाले, ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सामान्य माणसाला या रस्त्यावरून वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. अनेक नागरिकांना मणक्याचा, पाठीचा आजार जडला आहे. शासनाने प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता करणे आवश्यक आहे. तरच ख-या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो. चर्चा रंगत आली असताना सुरेश काळे म्हणाले की, शेतीमालाला हमीभाव देण्यात शासनाला अपयश आले आहे. शेतात जे मेहनतीने पिकवले जाते. त्याला बेभाव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे पिकांवर केलेला खर्च सुध्दा निघणे अवघड झाले असल्याचे ते म्हणाले. रंगनाथ चाबूकस्वार म्हणाले, शासनाने समाधानकारक काम केले आहे. शेतक-यांपर्यंत कशा प्रकारे योजना आणता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. शेतक-यांना विविध प्रकारच्या योजनांच्या लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली. त्यामुळे योजनेचा थेट फायदा हा तळागाळातील शेतक-यांना मिळाला आहे. हे या शासनाचे यशच म्हणावे लागेल.भारत उंडे म्हणाले, युतीचे शासन येणे आवश्यक आहे. यातून ख-या अर्थाने सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम शासनाने केले आहे. सरकारने रस्ते विकासाला महत्व दिले.दादाराव गायके यांनी सरकारचे समर्थन केले.
चावडीवरील गप्पांत सर्वच विषयांवर होतेय चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 1:12 AM