मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन मंगळवारी होत असून, या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चर्चा होऊन चर्चेअंती हे विधेयक मंजूर केले जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, आजच्या अधिवेशनात सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा न झाल्यास उद्यापासून आंदोलन काय असतं ते सरकारला कळेल, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.
विशेष अधिवेशनाची सुरुवात सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. विधेयकात मराठा समाजाला नोकरीत १२ आणि शिक्षणात १३ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून मिळाली. तर, सगेसोयरे अध्यादेशाबाबत कुठलाही निर्णय होणार नसल्याचेही समजते. त्यातच, जरांगे यांनी आज पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. जे खड्ड्यात जाणारं आरक्षण आहे ते दिलं जातंय. आज घोषणा करुन पहिल्यांदा ते सगेसोयऱ्याचं प्रकरण घ्या. अन्यथा आंदोलनाची आमची पुढची दिशा ठरली आहे. आज यांनी निर्णय न घेतल्यास उद्या आंदोलन सुरूच झालं, असा इशाराही जरांगे यांनी दिला. यावेळी, एसईबीसी आरक्षणातून नोकरी मिळालेल्या पण अद्यापही नियुक्ती न झालेल्या एका युवकांची व्यथाही त्यांनी सांगितली.
लाखो पोरं बेरोजगार आहेत, कमरेला बेल्ट बांधून फिरायचं, पण आंदोलन करायची वेळ त्यांच्यावर आलीय, आता वयही निघून चाललंय. वाटोळं झालं पोरांचं. आताही हे आरक्षण नाही टिकल्यावर तेच होणार त्यांचं. त्यामुळे, आमची मागणी ही ओबीसीतून आरक्षणाची आहे. तुम्हाला तीन लोकं महत्त्वाचे की ५ कोटी मराठे महत्त्वाचे?, असा सवालही जरांगे यांनी विचारला.
एसईबीसीतून एका पोराची अधिकारी म्हणून निवड झाली, त्याला गावात वाजत-गाजत नेलं. त्या घटनेला आता साडेचार वर्षे झाली आहेत. ते पोरगं आणखी गावात गेलंच नाही. कारण, गावाकडं सांगितलंय की साहेब झालाय म्हणून. पण, त्याला अजूनही नियुक्तीच मिळाली नाही. जमलेललं लग्नही अजूनही झालं नाही. वाटोळं झालं त्या मागच्या आरक्षणामुळं या पोरांचं, असे म्हणत एसईबीसी आरक्षणातील पीडित युवकाचं उदाहरणही जरांगेंनी दिलं.
खड्ड्यात जाणरं आरक्षण दिलं जातंय
ओबीसीमध्ये नोंदी सापडल्या आहेत, मग हसत खेळत दिलं पाहिजे. तुम्ही त्याचं एकट्याचं ऐकता आणि तो विरोधात गेल्यावर आमचं काय होईल असं म्हणता. पण, मराठे तुमच्या विरोधात गेल्यावर मग कसंय?, असे जरांगे यांनी म्हटले. उलट आपल्या नशिबात मराठ्यांच्या नोंदी कुणबीत सापडल्या आहेत. त्यामुळे, सहज दिलं पाहिजे होतं, सरकारला ही संधी आहे समजून आरक्षण दिलं पाहिजे. पण, जे टिकणारं आहे ते देत नाहीत. पण, जे खड्ड्यात जाणारं आहे ते आरक्षण हे द्यायलेत, असे म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला.
ओबीसीतूनच आरक्षण द्या
सरकारला काही घेण देणं नाही. सत्ताधाऱ्यांच्या अंगात रग आणि मगरुरी असेल तर मराठा मराठा आहे. आता, आमची हातं टेकली आहेत. मराठा आम्ही, कुणबी आम्ही आणि ओबीसीपण आम्हीच. म्हणून, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, असेही जरांगे यांनी म्हटले.