लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : जमिनीचा व्यवहार झालेला असल्याने मोठे घबाड मिळण्याच्या आशेने चोरटे आले. कपाटाची झाडाझडती घेतल्यानंतर हाती काहीच न लागल्याने आधार आणि पॅन कार्ड घेऊन चोरटे फरार झाले. शहागडमधील गहिनीनाथ नगरात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.गहिनीनाथनगर येथील डॉ. बाळासाहेब जायभाये यांनी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी जमिनीचा मोठा व्यवहार केला होता. त्यांच्या व्यवहारावर पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास डॉ. जायभाये यांच्या घराच्या मागील खिडकीच्या जाळ्या काढून घरात प्रवेश केला. कोणी नसलेल्या खोलीत जाऊन कपाट, सुटकेस, संदूक सर्व सामानाची उलथापालथ केली. तसेच शर्टाच्या खिशातून साडेतीन हजार रूपये चोरले. आणि हाती मोठी रकम न मिळाल्याने घरातील ज्येष्ठांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड चोरून नेले.डॉ. बाळासाहेब जायभाये यांच्या खरेदी विक्रीचा माग लागल्याने चोरटे धाडसी चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. मात्र, हाती काहीच लागले नसल्याने चोरट्यांनी नासधूस केली आहे.या बाबत डॉ. बाळासाहेब जायभाये यांनी गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस कर्मचारी घटना पंचनाम्यासाठी आले नाही. याबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे डॉ. जायभाये यांनी सांगितले. पंचनाम्यासंदर्भात सहाय्यक फौजदार सय्यद नासेर यांच्याशी संपर्क साधला असता आपण न्यायालयाच्या कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगत त्यांनी या विषयी बोलणे टाळेले.
घबाडाच्या आशेने आलेले चोरटे ‘आधार’ घेऊन गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:32 AM