लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मागील काही दिवसांपासून आष्टीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाच शुक्रवारी रात्री पुन्हा आष्टी बसस्थानकापासून जवळच असलेल्या कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांनी डल्ला मारला. यात २ लाख ३२ हजारांचे बियाणे चोरट्यांनी लंपास केले.मागील काही दिवसांपासून आष्टी परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोऱ्यांचा तपास पोलिसांना अद्यापही लागला नाही. असे असतानाच शुक्रवारी रात्री आष्टी बसस्थानकापासून जवळच असलेल्या राहुल सदाशिव सवादे (३३) यांच्या बालाजी अॅग्रो सर्व्हिसेस या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी बियाणे लंपास केले आहे.शनिवारी सकाळी आठवाजेच्या सुमारास दुकान उघडले असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी राहुल सवादे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि. विनोद इज्जपवार हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री आष्टीमध्ये वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली. आष्टी व परिसरात यापूर्वीही तीन मोठे दरोडे पडले होते, त्याचाही तपास अद्याप न लागल्याने भीतीचे वातावरण कायम आहे.
कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:16 AM