परतूर : गेल्या दोन महिन्यांमध्ये जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरी लांबविण्याची ही दुसरी घटना घडली असून, यापूर्वी घनसावंगी तालुक्यातील पाणेवाडी येथील मध्यवर्ती बँकेची तिजोरी पळवून नेली होती. त्यातही अशीच रक्कम होती. वाटूर येथे चोरट्यांनी बुधवारी रात्री बँकेची खिडकी तोडून ही तिजोरी लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात बँकेची खिडकी तुटल्याचे दिसले. त्यांनी लगेचच बँकेसह पोलिसांना याची कल्पना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेऊन पाहणी केली. असता, सराईत चोरट्यांचे हे काम असावे असे दिसून आले. यापूर्वी देखील याच बँकेची घनसावंगी तालुक्यातील पाणेवाडी येथील बँकेची तिजोरी लंपास केली होती. परंतु पोलिसांनी ती तिजोरी जप्त केली होती. त्यावेळी देखील ती तिजोरी चोरट्यांना फुटली नव्हती, तशाच प्रकारची ही तिजोरी दणकट असून, गोदरेज कंपनीची आहे. ही तिजोरी देखील साधारणपणे १९८७ मध्ये खरेदी करण्यात आली होती. असे सांगण्यात आले.
चोरट्यांनी बँकेतील तिजोरीसह अन्य साहित्यही लांबविल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी नव्याने रूजू झालले विक्रांत देशमुख, परतूरचे पोलीस निरीक्षक हुंबे, मंठ्याचे पोलीस निरीक्षक निकम यांच्यासह बँकेचे चेअरमन मनोज मरकड, व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख आदींनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी ठसेतज्ज्ञ तसेच श्वान पथकलाही पाचारण करण्यत आले होते. या प्रकरणात वाटुर येथील बँकेचे शाखा व्यवस्थापक शिवाजी साळवे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे करत असल्याचे सांगण्यात आले.
जालन्यातील चोरीचा तहपासही रखडलाजालना येथील सकलेचानगरमध्ये झालेल्या शंकर शर्मा यांच्या घरातील तेरा लाख रूपयांच्या चोरीचाही तपास अद्याप रखडलेला आहे. यात आणखी कुणालाच अटक केली नसल्याचे सांगण्यात आले. शर्मा यांच्या घरातील चोरी तसेच वाटुर येथील बँक फोडी प्रकरणाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान आहे.