परतूर : शहराबाहेरील साईबाबा मंदिराजवळील पेट्रोलपंपवर रात्री उभा केलेला कापसाचा आयशर ट्रक रात्रीच्या वेळी चोरट्यांनी पळवून नेला. चोरी गेलेल्या कापसाच्या ट्रकमध्ये ८१ क्विंटल ६५ किलो कापूस होता. त्याची बाजारभावानुसार सहा लाख रुपयाच्यावर किंमत आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, परतूर तालुक्यातील काकडे कंडारी येथील शेतकरी भगवान काकडे यांनी २१ मे रोजी एकरुखा गावातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून तो आयशर ट्रकमध्ये (क्र. एमएच २० सीटी ३९९०) भरला होता. ट्रक भरल्यानंतर हा ट्रक परतूर शहरातील साईबाबा मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर लावला. हा ट्रक उभा करून चालक घरी गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता चालक ट्रक घेण्यासाठी परत आला तेव्हा ट्रक जागेवर दिसला नाही. त्यांनी आसपास शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही. त्यामुळे ट्रक चालक समशेर खान पठाण यांनी भगवान काकडे यांना फोन करून कापसाने भरलेला ट्रक चोरी गेल्याचे सांगितले.
याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ८ लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा ट्रक व त्यामधील ६ लाख ८३ हजार किमतीचा ८१ क्विंटल ६५ किलो कापूस असा एकूण १३ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या घटनेचा तपास पोलिस नायब अशोक गाढवे हे करीत आहेत. या घटनेमुळे परतूर शहरात खळबळ उडाली आहे.