लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : घनसावंगी शहरातील दोन घरात घुसून चोरट्यांनी एकास काठीने मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून तब्बल तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून, पोलिसांना खुले आव्हान देणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.मागील काही दिवसांपासून घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भुरट्या चो-यांचे सत्रही सुरूच आहे. घनसावंगी पोलिसांना खुले आव्हान दिलेल्या चोरट्यांनी शुक्रवारी रात्री दोन घरे फोडली. शहरातील किराणा व्यवसायिक मोतीलाल हिरालाल जैन यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. जैन व त्यांच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवून २ लाख ६३ हजार रूपयांचे दागिने, रोख ८० हजार रूपये असा जवळपास २ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी शेख नाजीम शेख अमीर यांच्या घरात प्रवेश केला. नाजीम शेख यांना काठीने मारहाण करीत त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखविला. त्यांच्या घरातील कपाटात असलेले रोख ३० हजार रूपये व २७ हजार ८०० रूपये किंमतीचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी या दोन्ही ठिकाणाहून जवळपास ३ लाखाहून अधिकचा मुद्देमाल लंपास केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोनि शिवाजी बंटेवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी दाखल श्वान पथकाने शेख यांच्या घरातील चोरून नेलेले साहित्य फेकून दिलेल्या ठिकाणापर्यंत माग काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी सी. डी. शेवगण, स्थागुशाचे राजेंद्रसिंह गौर व इतर अधिका-यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, एकास मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून घरात चोरी केल्याच्या घटनेने घनसावंगी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.घनसावंगी व परिसरात चो-यांचे सत्र वाढले आहे. आता चक्क मारहाण करून घरातील दागिने, रोकड लंपास करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. या चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्यात घनसावंगी पोलीस अयशस्वी ठरत असून, पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.
पोलिसांना चोरट्यांचे खुले आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 12:37 AM