जालना : दारूची हौस भागविण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले आहे. सुंदरसिंग सखुसिंग राजपूत (रा. वल्लीमामू दर्गा जालना), कपिल भरत मिसाळ (रा. सावित्रीबाई फुलेनगर पडेगाव, छत्रपती संभाजीनगर, ह.मु. वलीमामू दर्गा, जाला) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी सुंदरसिंग राजपूत, कपिल मिसाळ यांनी घरफोड्या केल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना मिळाली. या माहितीवरून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सिंधी बाजार परिसरातील कापड दुकान, गायत्रीनगर परिसरातील घर, मोती मस्जीद जवळील दुकान, पुस्तकाचे दुकान आणि बालाजीनगर येथून घरफोडी केल्याचे कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरी केलेल्या नाईट पॅंन्टी व रोख रक्कम असा ७१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोहेकॉ. सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सुधीर वाघमारे, कैलास चेके, योगेश सहाने, सौरव मुळे यांनी केली आहे.