लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच असून, जानेवारी महिन्यात तब्बल ७४ चोऱ्या झाल्या आहे. यापैकी ४९ चो-या उघडकीस आल्या आहेत. ‘सैराट’ चोरट्यांचा शोध घेताना पोलीस मात्र बेजार होताना दिसत आहेत.गतवर्षीप्रमाणे नवीन वर्षातही चोरट्यांचा शहरात धुमाकूळ सुरूच असून या चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हानच उभे केले आहे. जानेवारी महिन्यात ७४ चो-या झाल्या असून, लाखो रुपये किमतीचा ऐवज पळविल्याचे समोर आले. यातील काही चो-या मोठ्या असून, या चोरट्यांचे अद्याप धागेदोरे लागले नाहीत.दोन महिन्यापूर्वी नवा मोंढा येथील एका सिगारेट व्यापा-याचे दुकान चोरट्यांनी फोडून ४८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेनंतर जानेवारी महिन्यात शहरातील आझाद मैदान जवळील एका सिगारेटच्या व्यापा-याचे गोडावून चोरट्यांनी फोडले होते. काही दिवसांपूर्वीच अंत्यविधीसाठी गेलेल्या एका व्यापा-याचे घरफोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या सर्व घटनांनी शहरात खळबळ उडाली होती. विशेषत: पती-पत्नी नोकरदार असलेल्या कुटुंबियांना त्यांचे घर सुरक्षित राहील अथवा नाही, याबाबत चिंता सतावू लागली आहे. याशिवाय ज्यांचे पती बाहेरगावी नोकरीला असून, ते आठवड्यातून एकदा घरी येतात, अशा गृहिणींमध्येही भीतीचे वातावरण आहे.या भागात सर्वाधिक चो-याजालना शहरासह जिल्ह्यातील अंबड, आंबा, परतूर, वडीगोद्री, शहागड, रोहिलागड, अंकुशनगर, घनसावंगी यासह आदी ठिकाणी चोरटे हात साफ करुन जात आहेत.गुन्हेगारी नियंत्रणातआणणे गरजेचेथंडीचा कडाका कमी होत असताना आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाच्या सोबतीला दुष्काळही येणार आहे. त्यामुळे परिस्थिती कशी वळण घेईल, हे काळच ठरवील. त्यासाठी पोलिसांनी आता गुन्हेगारांवर वचक ठेवून गुन्हेगारी नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.जिल्हावासियांना चिंतादुष्काळाच्या झळा लागत असतानाच वाढत्या गुन्हेगारीने जिल्हावासियांत चिंता वाढविली आहे. यातून जिल्ह्यातील गुन्हेगारीवरील नियंत्रण काहीसे सैल झाले असावे. जिल्ह्यात होणा-या दिवस-रात्रीच्या गस्तीही वाढ करण्यात आली आहे. परंतु, तरीही चो-यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
चोरटे सुसाट....पोलीस झाले हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 12:15 AM