लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली असून, आजवर वार्षिक सरासरीच्या ५.९ टक्के पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत जिल्ह्यात ६.६६ मिमी पाऊस झाला. विशेषत: भोकरदन तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी-नाले तुडुंब वाहू लागले आहेत. या भागातील रायघोळ नदीला पूर आला होता. तर धामणा, जुईसह इतर धरणात पाण्याची आवक सुरू झाली होती.गतवर्षी अल्प प्रमाणात झालेला पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गावा-गावात पाणी, चा-याचा प्रश्न गंभीर झाला असून, शहरी भागालाही याच्या झळा बसू लागल्या आहेत. ‘वायू’ वादळामुळे जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात मान्सूनच्या पावसाचे जालना जिल्ह्यात उशिराने आगमन झाले. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३५.४ मिमी म्हणजे ५.९ टक्के पाऊस झाला आहे. आजवर सर्वाधिक भोकरदन तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी, रविवारी सलग दोन दिवस या भागात पाऊस झाला. त्यामुळे रायघोळ नदीला दोन दिवस पूर होता. तर जुई, धामणा धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. उशिरा आलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने भोकरदन तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.मात्र, जिल्ह्यातील इतर भागांना अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने पेरणीच्या कामांनाही वेग आला असल्याचे चित्र जवळपास सर्व जिल्ह्यात दिसून येत आहे.४९ पैकी २३ महसूल मंडळांत पाऊसजिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी केवळ २३ महसूल मंडळांत सोमवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत पाऊस झाला. २३ महसूल मंडळांपैकी यातील ८ मंडळात १० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. यात जालना ग्रामीण २ मिमी, विरेगाव ११ मिमी, बदनापूर १० मिमी, रोशणगाव ३ मिमी, दाभाडी १७ मिमी, सेलगाव ६ मिमी, भोकरदन २५ मिमी, सिपोरा बाजार ४५ मिमी.धावडा २९ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ४२ मिमी, हस्राबाद २० मिमी, राजूर २ मिमी, केदारखेडा ९ मिमी, अनवा ४२ मिमी, माहोरा ४ मिमी, सातोना १३ मिमी, गोंदी ९ मिमी, सुखापुरी ९ मिमी, घनसावंगी १४ मिमी, तीर्थपुरी ३२ मिमी, कुंभार पिंपळगाव १२ मिमी, अंतरवली टेम्बी २१ मिमी, जांभ- समर्थ महसूल मंडळात ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. इतर महसूल मंडळात पाऊस झाला नाही.
तहानल्या मातीला जलसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:06 AM