राज्यात पुन्ह एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावेळी, "ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्यांना त्रास देतील, त्या जातीचा नेता आम्ही पाडणार. आल्याच विधानसभा निवडणुका जवळ." असे म्हणत, जरांगे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना इशारा दिला आहे. ते जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकारांसोबत बोलत होते.
जरांगे म्हणाले, "आमच्या लोकांना बीड, माजलगाव, केज, गेवराई येथे मारहाण झाली. महाजनवाडी बीड तालुक्यातील लोकांना तलवारीने मारलंय. त्यांच्या नेत्याचे काम आहे, त्यांच्या जातीला शांततेचे आवाहन करण्याचे. तुम्ही म्हणताय ते कोण विरोधक आहेत ना, त्यांनीही या नेत्यांना आरोप करायला हवेत की, तुम्ही का आवाहन करत नाही? जरांगे पाटील शांततेचे आवाहन करत आहेत, तुम्ही का करत नाही? ते मजा बघतात, परदेशात जाऊन झोपतात आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय."
"...आपण काही अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही" -"मी कुणाला पाडा म्हणालो का? कुणाला निवडून आणा म्हणालो का? काय घोषणा होत्या त्या दिवशी कलेक्टर ऑफिससमोर? मस्ती आहे का...? मी काय केलं होतं? पाडा म्हणालो का तिला (पंकजा मुंडे)? तरीही मी माझ्या समाजाला आवाहन केले आहे, मराठ्यांनो शांत रहा एक दोन महिने. यांना चुका करू द्या. ज्या दिवशी नरड्याला लागेल त्या दिवशी बघू. आपण काही अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही. पण सध्या शांत राहा. गृहमंत्र्यांनी आणि बीडच्या एसपी साहेबांनी तातडीने लक्ष घालावे. यांचा जाणून बुजून उद्रेक करण्याचा अंदाज आहे. यांना आवर घाला. शहाने असाल तर यांना आवर घाला आम्ही अजूनही शांत आहोत आणि महिना दोन महिने शांत राहाणार आहोत. हा शब्द आहे माझा. पण फारच अन्याय होत असेल, तर आम्ही शांत तरी कसे राहायचे, याचे उत्तर प्रशासनानेच द्यावे," असेही जरांगे म्हणाले.
"मराठा समाजाला माझे आवाहन आहे, शांत राहा" -जरांगे म्हणाले, "महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठा समाजाला माझे आवाहन आहे की, शांत राहा. बघूया हे किती दिवस अन्या करताता. काय अन्याय करायचा ते करू द्या यांना. बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील लोकांनाही यांनी बराच त्रास दिला. तरी बीड जिल्ह्यातील मराठा समाजाला माझे आवाहन आहे की तरी शांत राहा. नरड्याला लागल्यावर बघूया."
याला खत-पाणी घालण्याचं काम सरकार करतंय का? असा प्रश्न केला असता, जरांगे म्हणाले, "नाही सरकार नाही करत, त्यांचे नेते करतायत. आम्ही गेल्या एक दीड महिन्यापासून शांततेचे आवाहन करत आहोत. ते करत नाहीत. याचा अर्थ त्यांना जातीय तेढ निर्माण करायची आहे आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे."
...त्या जातीचा नेता पाडणार -यावेळी, धनंजय मुंडे यांचे नाव न घेता इशारा देताना जरांगे म्हणाले, "खरे तर जय-पराजय कुणाचा तरी असतोच. मराठ्यांनीच पाडलंय की काय? असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोकं मराठ्यांच्या मागे लावायचे. त्याने काही होत नसते. मान्य करायचा जय-पराजय. मी जाहीर पणे सांगितले आहे, ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्यांना त्रास देतील, त्या जातीचा नेता पाडणार आम्ही. वेळ प्रसंगी तेथे उमेदवार देणार नाही, पण त्याला पाडणार. आल्याच विधानसभा निवडणुका जवळ."