जालना : मार्च महिन्यात वादळी वारे, अवकाळी पावसामुळे रब्बीतील पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. ३३ टक्क्यांहून अधिक नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासकीय निकषानुसार अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ३ कोटी ६७ लाख ८८ हजार रूपये अनुदान वाटपास शासनाने मंजुरी दिली आहे. हे अनुदान जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांना मिळणार आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीच्या 'जखमांवर' केवळ साडेतीन कोटींचा 'मलम' शासनाने लावल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
गत काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या अनुदानाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिके हाताशी आलेली असताना मार्च महिन्यात वादळी वारे, अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. विशेषत: जालना, बदनापूर, जाफराबाद, भोकरदनसह इतर तालुका व परिसरातील रब्बीतील पिके, बागायती क्षेत्रासह फळपिकाला याचा मोठा फटका बसला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. नुकसानीची तीव्रता पाहता शासनानेही पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
संपकाळात प्रशासकीय यंत्रणेने शेतशिवारात जावून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. प्रशासकीय पंचनाम्यानंतर जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. शिवाय या नुकसानी पोटी ३ कोटी ६७ लाख ८७ हजार ६१५ रूपये अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली होती. प्रशासकीय पातळवरून अहवाल प्राप्त होताच शासनाने १० एप्रिल रोजी जालना जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ६७ लाख ८८ हजार रूपये अनुदान मंजूर केले आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश सुरूचगतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून अनेक मंडळांना वगळण्यात आल्याचा आरोप करीत विविध संघटनांसह शेतकरी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करीत आहेत. त्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी किचकट शासकीय नियमांमुळे या नुकसान अनुदानापासून शेतकरी वंचित राहिल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणीही होत आहे.
नुकसानीची अशी होती आकडेवारी (हेक्टरी)तालुका- शेतकरी- जिरायत- बागायत- फळपिके- एकूणजालना- ३७२३- ००-११६८.००- ५९०.००-१७५८.००बदनापूर- २४०- ००-८२.४७-१८.८७- १०१.३४भोकरदन- २६- ००- १७.७०- ००.००- १७.७०जाफराबाद- २२६- ०५.००- ८७.४५- ००.००- ९२.४५परतूर- ००- ००-००-००-००-००-मंठा-००- ००-००-००-००-००-अंबड-००- ००-००-००-००-००-घनसावंगी-००- ००-००-००-००-००-एकूण -४२१५- ५.००- १३५५.६२- ६०८.८७- १९६९.४९