जालना : जालना शहरातील वसुंधरानगर येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्याला बंदूक व चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी गुरूवारी जेरबंद केले आहे. प्रदीप केशव नरवडे, आकालसिंग राजुसिंग जुन्नी (दोघे रा. म्हाडा कॉलनी) व राजू सुरासे (रा. दत्तनगर, जालना) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यात स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना तर सदर बाजार पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
वसुंधरानगर येथील व्यापारी सावरमल जाला यांना ९ मे रोजी दुपारी चौघांनी चाकू व बंदुकीचा धाक दाखवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लुटले होते. भरदिवसा घडलेेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. घटनेचे गार्भीय पाहता, पोलीस अधीक्षकांनी आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन तर सदर बाजार पोलिसांचे एक अशी तीन पथके नियुक्ती केली होती. हा सर्वप्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांना तपासात मदत झाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना जालना येथून ताब्यात घेतले. तर चंदनझिरा व सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने एकास ताब्यात घेतले.
या तिघांवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोनि. संजय देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे. गुरुवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.