लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील ७० गावातील दूध उत्पादक शेतकरी शासकीय दूध संकलन केंद्राला वाजवी दराने दूध विक्री करतात. असे असतानाही शासनाने दोन महिन्यापासून दूध उत्पादन शेतकऱ्यांचे तब्बल तीन कोटी रुपये थकविल्याने शेतकऱ्यांत संताप आहे.जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातील माहोरा, जालना असे दोन शासकीय दूध संकलन केंद्र आहे. जिल्ह्यातील ७० गावातील दूध उत्पादन शेतकरी २५ रुपये लिटर शासकीय दराने दुधाची विक्री करतात. नियमित २५ ते ३० हजार लिटर दूध संकलित केले जाते. मात्र, जिल्ह्यात सलगच्या दुष्काळामुळे पशुपालकांना दुभती जनावरे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या वर्षी रबी हंगाम वाया गेल्याने पुरेशा प्रमाणात कडब्याचा चारा उपलब्ध झाला नाही. यामुळे पशुपालकांनी विकतचा चारा घेऊन दुभती जनावरे सांभाळली. ज्या शेतक-यांना आर्थिक अडचणी आल्या त्यांनी तर बेभाव दुभत्या जनावरांची नाईलाजाने विक्री केली. असे असताना सुध्दा माहोरा आणि जालना केंद्रातील जामवाडी, गणेशपूर, येवता, आसाई, राजूर, केदारखेडा, वरुड, आदी ७० गावातील पशुपालक शासकीय दूधसंकलन केंद्राला दूध विक्री करतात.असे असताना शेतक-यांना नियमित रकमेचे वाटप होत नसल्याची ओरड शेतक-यांतून होत आहे. दोन महिन्यांचे ३ कोटी रुपये अद्यापही दुग्ध विकास विभागाकडून शेतक-यांना देण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
दूध उत्पादकांचे तीन कोटी रुपये थकीत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:55 AM