लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील सर्वे क्रमांक ४८८ मधील पोलीस वसाहतीमधील अंतर्गत रस्ते व इमारतींच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांच्या निधीस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच या कामास सुरुवात होणार आहे.जालना पोलीस मुख्यालयाच्या सर्वे क्रमांक ४८८ मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. मागील अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे पोलीस वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच बहुतांश निवासी क्वॉर्टरची दुरावस्था झाली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना पावसाळ्यात याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे इमारतींच्या दुरुस्तीसह अंतर्गत रस्तांची कामे करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने गृह विभागास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलीस मुख्यालयातील इमारती व निवासी क्वॉर्टरच्या दुरुस्ती, रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक बसविणे, भूमिगत गटार आदी कामांसाठी ९६ लाख ७५ हजार १०७ रुपये, पॉर्किंग शेड व जॉगिंग ट्रकच्या कामासाठी ९४ लाख, ७६ हजार ५२२, तसेच अंतर्गत सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी ९९ लाख १५ हजार २५१ रुपयांची मागणी करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या खर्चाच्या या अंदाजपत्रकास गृह विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून, दोन कोटी ९३ लाख, ४६ हजार ९६५ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. बांधकाम विभागामार्फत लवकर ही कामे केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रस्ते दुरुस्तीसाठी तीन कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:46 AM