लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालना भागातील अंबड मार्गावरील यशवंतनगर जवळील श्रीकृष्णनगरमध्ये रविवारी रात्री तीन घरे फोडून चोरट्यांनी हजारो रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. गेल्या आठवड्यातही या भागातील एका पोलीसाच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.श्रीकृष्णनगरमधील रहिवासी ज्ञानदेव बालासाहेब ढाकणे, आरोग्य सेविका डुकरे-कोटीकर आणि ग्रामसेवक हुशे यांची घरे फोडून चोरट्यांनी हात साफ केला. विशेष म्हणजे या तिन्ही घरांना कुलूप होती. ते सर्वजण बाहेरगावी गेले होते. चोरटे हे दुचाकीवरून आले होते. चोरटे तीनजण असल्याचे सांगण्यात आले. सीसीटीव्हीत काहीजण कैद झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या कॉलनीत जवळपास दहा ते १२ पोलीस अधिकारी, कर्मचारी वास्तव्यास असताना चोरट्यांनी ही हिंमत केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.त्यातच याच भागात शंभर ते १५० मीटर अंतरावर पालकमंत्री बबनराव लोणीकरांचे निवासस्थान आहे. असे असताना चोरट्यांनी या भागाला आपले लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही चोरी झाल्याची माहिती देण्यासह तक्रार दाखल करण्यासाठी परिसरातील नागरिक पोलीस तालुका जालना पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांना तेथेही चुकीचा अनुभव आला. तीन चोऱ्या झाल्या असताना केवळ एकच तक्रार घेण्यात आली. आपण कुलूप लावून बाहेर जातात मग चोरट्यांना ही संधी मिळते, असा मार्गदर्शनाचा डोसही पोलिसांनी तक्रार करण्यासाठी आलेल्यांना दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी प्रा. दिगंबर दाते यांच्याशीही पोलिसांनी चुकीची भाषा वापरून सल्लाच देण्यात धन्यता मानल्याने नागरिक जाम चिडले होते.
श्रीकृष्णनगरमध्ये एकाच रात्री तीन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 1:29 AM