जालना : 'थ्री- इडियट' चित्रपटात दाखविण्यात आलेली 'व्हॅक्युअम' प्रसूतीप्रमाणेच एका महिलेची प्रसूती जालना येथील जिल्हा महिला रूग्णालयात गुरूवारी सकाळी करण्यात आली. महिलेसह बाळाच्या जीवाला धोका असलेली गुंतागुंतीची ही 'व्हॅक्युअम' प्रसूती यशस्वी करण्यासाठी १७ तज्ज्ञ डॉक्टरांना तब्बल दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्या महिलेची प्रसूती यशस्वी झाली असून, महिलेसह बाळाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील गोदावरी सुंदरलाल गुडेकर (२१ जि. जालना) या गर्भवती महिलेला शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास प्रसूतीसाठी जिल्हा महिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्या महिलेला 'कायपोस्कोलिओ' हा आजार होता. या आजारामध्ये रूग्णाच्या पाठीचा मणका हा पूर्णत: वाकडा तिकडा असतो. विशेषत: या आजारामुळे संबंधित महिलेच्या गर्भाशयात बाळाला जी जागा हवी असते ती ही खूप कमी होती. यामुळे संबंधित महिलेची प्रसूती ही अतिशय गुंतागुंतीची होवून तिच्यासह तिच्या बाळाच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता. शिवाय प्लेटलेट केवळ ७८ हजार असल्यामुळे सिझर करणेही शक्य नव्हते. गुंतागुंतीची ही प्रसूती नॉर्मल किंवा सिझर करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. शिवाय भूल देण्यासह प्रत्येक प्रक्रियेत काळजी घेणे गरजेचे होते. यामुळे उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी 'व्हॅक्युअम' प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. ही प्रसूती यशस्वी करण्यासाठी एक दोन नव्हे तब्बल १७ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जालना महिला रूग्णालयात दाखल झाली. संबंधित महिलेला भूल देण्यासह तिची 'व्हॅक्युअम' प्रसूती यशस्वी करण्यासाठी डॉक्टरांना दोन तासांचे शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तज्ज्ञांच्या या शर्थीच्या प्रयत्नांमुळे जालना जिल्हा रूग्णालयातील गुंतागुंतीची ही 'व्हॅक्युअम' प्रसूती यशस्वी झाली आहे. त्या महिलेसह तिच्या बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे महिला रूग्णालयाकडून सांगण्यात आले.
या तज्ज्ञांनी केले प्रयत्नमहिला रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. आर.एस. पाटील, सत्रीरोग तज्ज्ञ डॉ.बी. जे अंभोरे, डॉ. एस.जी. गौल, डॉ. अमोल लोंढे, डॉ. प्रिती चव्हाण- राठोड, डॉ. कृष्णा वानखेडे, डॉ. फिका, डॉ. शितलकुमार, डॉ. लिना, डाॅ. बी.जे. घोलप यांच्यासह इतर तज्ज्ञ डॉक्टर, रूग्णालयातील परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे त्या महिलेची प्रसूती यशस्वी झाली.
प्रयत्नामुळे यश आलेराणीउंचेगाव येथील एक महिला गुरूवारी सकाळी प्रसुतीसाठी जिल्हा महिला रूग्णालयात दाखल झाली होती. त्या महिलेस 'कायपोस्कोलिओ' हा आजार होता. शिवाय प्लेटलेट ७८ हजारावर होत्या. त्यामुळे सिझर करणे शक्य नव्हते. पर्याय केवळ 'व्हॅक्युअम' प्रसूतीचा होता. रूग्णालयातील १७ तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही 'व्हॅक्युअम' प्रसूती यशस्वी झाली.- डॉ. आर.एस.पाटील, अधीक्षक स्त्री रूग्णालय