जालना : दुचाकीवरुन आलेल्या तीन भामट्यांनी जालन्यातील मोंढ्यात एका व्यापाऱ्याचे तीन लाख रुपये लुटल्याची घटना सोमवारी भर दुपारी घडली.शहरातील बाजार समितीच्या परिसरात सोमवारी दुपारी दोन वाजता भोकरदन तालुक्यातील धावडा येथील किराणा मालाचे व्यापारी खालेदखान अक्रमखान पठाण यांची तीन लाख १२ हजार रूपयांची बॅग लंपास केली. मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी ही लूट केल्याचे पठाण यांनी सांगितले. मोंढा परिसरात किराणा माल खरेदीसाठी पठाण जालन्यात आले होते.
दुपारी नेहमीप्रमाणे पठाण हे त्यांची बॅग घेऊन व्यापाऱ्याकडे जात होते. त्यावेळी एका मोटारसायकलवरून तीनजण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने जोरदार धक्का दिला, तर दुसऱ्याने त्यांच्या हातातील बॅग लंपास केली. तिसरा गाडी सुरू ठेवून उभा होता. काही कळण्याच्या आत चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले. पठाण यांनी आरडाओरड केली. परंतु उपयोग झाला नाही. या घटनेची माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील मोंढ्यात येऊन पाहणी केली. शेजारील चार ते पाच दुकानांच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. परंतु यात सायंकाळपर्यंत कोणालाही अटक केली नाही.
मोंढ्यात लुटीची चौथी घटना गेल्या दोन ते तीन वर्षात जालन्यातील या मोंढ्यात व्यापारी तसेच बँकेची रोख रक्कम लुटण्याची ही चौथी घटना आहे. असे असले तरी व्यापारी तसेच बाजार समितीने मागणी करूनही या भागात पोलीस चौकी उभारलेली नाही. जालन्यात दररोज कोट्यवधीचा व्यवसाय होतो. हे माहित असूनही पोलिसांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी पोलिसांची रात्री आणि दिवसाही गस्त होत असे, परंतु आता ही गस्त होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.