जालना : जिल्ह्यातील १४५ गावे आणि ८ वाड्या -वस्त्यांवरील २ लाख ९३ हजार २६८ नागरिकांची तहान १७१ टँकरद्वारे भागविली जात आहे. टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत असून पाण्याबरोबरच पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला. त्याचाच परिणाम म्हणून भूजलस्तरही त्याच गतीने खालावत आहे. त्यामुळे अखेर फेब्रुवारी महिन्यातच जिल्हाभरातील १४५ गावे व ८ वाड्यांना १७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाळ्यातील चार महिन्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४० ते ४५ टक्के एवढे अत्यल्प पर्जन्यमान झाले. जिल्हाभरातील बहुतांश मोठे, मध्यम आणि लघु पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. तसेच भूजलस्तरही अपेक्षित प्रमाणात उंचावला नाही. दरम्यान, दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यानुसार आता भूजलस्तरही खालाऊ लागला आहे.
दुष्काळ किंवा टंचाई जणू जिल्ह्याच्या पाचवीलाच पूजलेली असावी, असे चित्र आहे. गावोगावी खासगी पाण्याच्या टँकरची चलती आहे. शुद्ध पाणी मिळत नाही म्हणून नागरिक पाणी विकत घेतात. काही गावांतील पाणीपुरवठ्याच्या योजना ३० ते ३५ वर्षे जुन्या झाल्या आहेत. दुरुस्ती किंवा नव्या योजनांची कामे वेळेत सुरू होत नाहीत. पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार पाणीटंचाईचे एक कारण मानले जाते.
जिल्ह्यातील दोन लाख ९३ हजार २६४ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जलयुक्त शिवार योजनेतील कामे झाल्याचे अधिकारी कागदोपत्रीच दाखवत आहेत. पण, त्या योजनांमध्ये पाणीच साठत नसल्यामुळे तेथील गावांमध्येही जिल्हा प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले आहेत. पाझर तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे नागरिकांसाठी आणि पशुधनासाठी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
भोकरदन तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकर भरण्यासाठीही पाणी नसल्यामुळे टँकर चालकांना वीस ते तीस किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. भोकरदन तालुक्यातील ४१ गावे आणि ५ वाड्या-वस्त्यांवरील १ लाख ०५ हजार ४७६ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टँकर भोकरदन तालुक्यात आहेत.