यावर उपाय म्हणून नेमके काय करावे या विवंचनेत प्रशासन अर्थात आरोग्य विभाग आहे.
पंधरा दिवसांपासून लस नसल्याने केवळ पाच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. ते देखील केवळ १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांसाठी होते. बुधवारी रात्री लसीचा साठा उपलब्ध झाला. त्यातून त्याचे समन्यायी वाटप कसे करावे हे अद्याप ठरले नसल्याने अधिकारी चक्रावून गेले आहेत. लसीकरण केंद्रावर तर गर्दीचा बाजार भरल्याने सुरक्षित अंतराचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. याचा सर्वांत मोठा मनस्ताप हा ज्येष्ठ नागरिकांना होत आहे.
चौकट
टाईमटेबल निश्चित करावे
लसीकरणासारख्या गंभीर मुद्द्यावर प्रशासकीय पातळीवर काही मोजकेच अधिकारी नियोजन करीत आहेत. त्यामुळे त्यांचे हे नियोजन कोलमडले आहे. जास्तीत जास्त लसीकरण व्हावे म्हणून आरोग्य विभाग तसेच राज्य सरकार प्रयत्नरत आहे. परंतु, नियोजन नसल्याने हे लसीकरण ठप्प झाले आहे. लसीकरण केंद्रांवरील गोंधळ म्हणजे प्रशासनाची नाचक्कीच म्हणावी असे होत आहे. त्यामुळे मोबाईल तसेच शहरातून रिक्षा फिरवून माहिती देणे गरजेचे आहे. यासाठी वृत्तपत्रांचाही आधार घेता येऊ शकतो. परंतु, हे काहीच होत नसल्याने नागरिकांची ऐन उन्हात तारांबळ उडत आहे.
------------------------
पहिला महत्त्वाचा की दुसरा...
लसीकरण आता अशा टप्प्यावर येऊन ठेपले आहे की, अनेक नागरिकांनी महिना तसेच दीड महिन्यापूर्वी कोव्हिशिल्ड अथवा कोव्हॅक्सिन या दोन्हीपैकी एक डेस घेतला आहे. त्यांचे २८ आणि काहींचे ४५ दिवस झाले आहेत. त्यामुळे दुसरा डोस द्यावा अशी अनेकांची मागणी आहे, तर राज्य सरकारने कोव्हॅक्सिनची लस खरेदी केल्याने ती लस दुसरा डोस देण्याऐवजी पहिला म्हणजेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना द्यावी अशा सूचना असल्याचे सांगण्यात आले. परंतु, हा दुजाभाव का, असा सवाल यावेळी अनेकांनी व्यक्त केला.