लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बंदी असतानाही प्लास्टिक साठवून ठेवणाऱ्या दोन ट्रान्सपोर्टवर छापा टाकून तब्बल तीन प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही कारवाई नगरपालिकेने गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जालना शहरातील जुना मोंढा भागात केली. जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. याबाबत जनजागृती करण्यात आली. प्लास्टिक वापरू नये, या संदर्भात आवाहन करण्यात आले. त्यानंतर सर्व नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांना सूचना देऊन प्लास्टिक बंदी संदर्भात कारवाया करण्यास सांगितले. त्यानंतर सर्वांनी कारवायांची मोहीम हाती घेतली. जालना नगरपालिकेनेही यापूर्वी अनेक कारवाया करून हजारोंचा दंड वसूल केलेला आहे. तरीही काही लोक छुप्या पध्दतीने प्लास्टिकचा वापर करत होते. पालिकेकडून वारंवार तपासणी करण्यात येते.दरम्यान, गुरूवारी मोंढा मार्केटमधील गिरीराज व जळगाव ट्रान्सपोर्टमध्ये प्लास्टिकचा साठा असल्याची माहिती पालिकेला मिळाली. त्याप्रमाणे मुख्याधिकारी संतोष खांडेकर हे स्वच्छता निरीक्षक नारायण बिटले व जॉन्सन कसबे यांच्यासह फौजफाटा घेऊन ट्रान्सपोर्टवर पोहोचले. छापा मारला असता त्याठिकाणी अंदाजे तीन टन प्लास्टिक मिळून आले. हे सर्व प्लास्टिक जप्त केले आहे. रात्री उशिरापर्यंत नगरपालिकेच्या वतीने त्यांच्याविरोधात कारवाईची नोंद करणे सुरू होते. या मोठ्या कारवाईने साठा करणाºयांचे धाबे दणाणले.