जालना : विनापरवाना विक्रीसाठी औषधींचा साठा करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी तीन वर्ष साधा कारावास व एक लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना मंठा शहरात घडली होती.डॉ. सुनील नारायण राठोड, सुधीर नारायण राठोड (दोघे रा. मातृछाया हॉस्पिटल, शंकरनगर मार्केट यार्ड परिसर मंठा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मंठा शहरातील डॉ. सुनील नारायण राठोड, सुधीर नारायण राठोड यांनी विनापरवाना औषधींचा साठा केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक अंजली मिटकर यांनी २२ नोव्हेंबर २०१६ रोजी कारवाई करून मातृछाया हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या ॲलोपॅथिक औषधींची विक्री करण्यासाठी साठा केल्याचे दिसून आले. कागदपत्रांची चौकशी केली असता परवाना नसल्याची बाब समोर आली. या प्रकरणात अंजली मिटकर यांनी यांनी न्यायालयात तक्रार दिली होती. या प्रकरणात सरकार पक्षाकडून अंजली मिटकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. एस.व्ही. कबनुरकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश- ०३ एस. आर. तांबोळी यांनी आरोपी डॉ. सुनील नारायण राठोड, सुधीर नारायण राठोड यांना विना परवाना औषधसाठा केल्याप्रकरणी औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या कलम २७६ (ब) (ii) अन्वये दोषी धरून तीन वर्ष साधा करावास व एक लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली.