जामखेड (जि. जालना) : सावकाराच्या जाचाला कंटाळून एका ३० वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबड तालुक्यातील पागीरवाडी येथे ९ मार्च रोजी घडली. भारत साहेबराव काळे (३०, रा. पागीरवाडी, ता. अंबड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मयताची पत्नी उषा काळे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत काळे यांची पागीरवाडी शिवारात अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. ते पत्नी, मुलगा, मुलगीसह गावातच राहतात. त्यांनी काही वर्षांपूर्वी संशयित शिवाजी भोजने, कुंडलिक भोजने, रख्माजी कुंडकर आणि के. के. भोजने ( सर्व रा. जामखेड, ता. अंबड) यांच्याकडून शेतीच्या कामासाठी व्याजाने कर्ज घेतले होते. त्यांनी काही प्रमाणात पैसे परतदेखील केले. परंतु, सावकारांनी व्याजाच्या पैशाची वारंवार मागणी करून भारत काळे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. शिवाय, संशयित शिवाजी भोजने, कुंडलिक भोजने यांनी भारत काळे यांना चापट-बुक्क्यांनी मारहाणदेखील केली होती.
यामुळे भारत काळे हे चिंतेत होते. ९ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पागीरवाडी येथील दत्ता अच्युत पागीरे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन भारत काळे यांनी आत्महत्या केली. नातेवाइकांनी त्यांना तातडीने अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सुरुवातीला याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शुक्रवारी रात्री मयताची पत्नी उषा भारत काळे यांच्या फिर्यादीवरून संशयित शिवाजी भोजने, कुंडलिक भोजने, रख्माजी कुंडकर, के. के. भोजने यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.