२३ दिवसांत पाचवी घटना : व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण, भरदिवसा लुटण्याचे प्रकार वाढले
जालना : शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भरदिवसा लुटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून भरदिवसा चोरटे लाखो रुपयांचा ऐवज लंपास करीत आहे. मागील २३ दिवसांत तब्बल ५ घटना घडल्या असून, रविवारी दुपारी व्यापाऱ्याला चाकू व पिस्टलचा धाक दाखवून लुटल्याच्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्यात मागील पाच महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पाच महिन्यांत ६ दरोडे, १६ जबरी चोरी, ५८ घरफोड्या अशा एकूण ३४९ चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी केवळ ९७ चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. चोरटे भर दिवसा येऊन व्यापाऱ्यांना लुटून फरार होत आहे. तरीही पोलीस प्रशासनाकडून म्हणावे तसे पाऊल उचलले जात नाही. त्यातच जालना शहरात मागील २३ दिवसांत तब्बल ५ लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. भरदिवसा घडलेल्या एकाही घटनेचा पोलिसांना शोध लावता आला नाही. १६ एप्रिल रोजी जालना शहरातील नवीन मोंढा येथील मुकेश मोतीलाला काबरा हे दुकानाचे शटर बंद करून एका बॅगमध्ये तीन लाख रुपये घेऊन घरी निघाले होते. गाडीजवळ आल्यावर तिघांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला हाेता. या घटनेच्या दोन दिवसांनंतर अंबड येथील खडकेश्वर येथे दरोडखोरांनी एका कुटुंबास मारहाण करून मुद्देमाल लंपास केला होता. त्यानंतर २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जालना शहरातील नाव्हा चौफुलीजवळ एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून लुटले, तर याच दिवशी सायंकाळी जालना- औरंगाबाद रोडवरील टोल नाक्याजवळ एका व्यक्तीकडील चार लाखांची बॅग हिसकावून नेल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच रविवारी दुपारी पुन्हा एका व्यापाऱ्याला पिस्टल व बंदुकीचा धाक दाखवून लुटले आहे. एकूणच चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
१६ जबरी चोऱ्यांपैकी केवळ ४ उघड
मागील पाच महिन्यांत जिल्ह्यात तब्बल १६ जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यातील केवळ ६ घटना उघडकीस आल्या आहेत. इतर घटनांचा तपास पोलीस करीत आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
आकडेवारी
पाच महिन्यांत झालेल्या चोऱ्या
३४९
उघडकीस आलेल्या चोऱ्या
९७
जबरी चोरी
१६
दरोडा
६