जालना : गुन्ह्यातील कलम कमी करून आरोपीला मदत करणे, वारंवार सूचना देऊनही तपासाकडे कानाडोळा केल्याचा ठपका ठेवून तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती खेडकर यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी बदली केली आहे.
जालना पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली होती. याच गुन्ह्यात पोनि. मारुती खेडकर व अन्य दोन कर्मचाऱ्यांनी आरोपी विरुद्धची कलम कमी केले. गुन्ह्याचा तपासही करीत नसल्याने सदरील महिलेने याची तक्रार पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्याकडे केली. पोलीस अधीक्षकांनी पोनि. खेडकर यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या. परंतु, त्यांनी तपास करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलीस निरीक्षक खेडकर व दोन अन्य कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू हे चौकशी करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दिली.