लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड येथील मत्स्योदरी देवी मंदिराजवळ रस्त्याचे काम सुरु असताना फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, रविवार सकाळपासून जालना शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.अंबड येथे रस्त्याचे काम करण्यासाठी संबंधित कंत्राटदार एजन्सीमार्फत पोकलेनव्दारे रस्ते खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करत असताना अंबड येथील जलशुध्दीकरण केंद्रातून जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पोकलेनचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनीला मोठे भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. जलवाहिनीला पडलेल्या या भगदाडामुळे जालना शहरातील पाणीपुरवठा थांबवण्यात आला.पाणीपुरवठा विभागाचे सभापती रमेश गौरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली न. प. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेश बगळे, कंत्राटदार एजन्सीचे कामगारांनी तातडीने अंबड येथे धाव घेऊन फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करुन अंबड येथील जलशुध्दीकरण केंद्रातून जालना शहरासाठी पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. रविवारी सकाळपासून शहरातील विविध भागांसाठी पाणी वितरीत करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सांगितले.दरम्यान, रस्त्याचे काम करणा-या कंत्राटदार एजन्सीला सोमवारी जालना पालिकेतर्फे नोटीस बजावण्यात येणार असून, पाण्याची झालेली नासाडी तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई करुन घेण्यात येणार असल्याचे देखील गोरंट्यांल यांनी सांगितले.या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले आहे.
आजपासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:57 AM