लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील आनंदवाडी श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम जन्म नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थाच्यावतीने देण्यात आली आहे.हा उत्सव रविवार १८ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. यात काकड आरतीने दररोज उत्सवाचा प्रारंभ होणार असून, दुपारी तसेच रात्री भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात रविवारी प्रसाद चौधरी यांचे पहाटे सव्वा पाच वाजता गायन होईल. सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत हभप संजय जोशी (परभणी) यांचे कीर्तन तर रात्री ८ ते १० या वेळेत अंजली देशपांडे (औरंगाबाद) यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. १९ रोजी पहाटे अंजली देशपांडे यांचे गायन तर सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा कुलकर्णी यांचे कीर्तन, रात्री ८ ते १० या वेळेत संतोष कुलकर्णी यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे. २० रोजी जालना येथील गायिका ज्योती देशपांडे यांचे गायन, सायंकाळी ५ ते ६.३० वाजता सुनेत्रा कुलकर्णी यांचे कीर्तन होणार आहे. तर रात्री ८ ते १० या वेळेत नादब्रह्म संगीत मंचचा कार्यक्रम होणार आहे. २१ रोजी सकाळी प्राजक्ता जोशी यांचे गायन, सायंकाळी स्नेहलता साठे यांचे कीर्तन तर रात्री दिनेश संन्यासी यांच्या संगीतमय भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ रोजी कृतिका कुलकर्णी, श्रावणी कुलकर्णी यांचे गायन होणार असून, माधुरी ओक व स्नेहलता साठे यांचे सायंकाळी कीर्तन आणि रात्री श्रीराम मंदिर भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. २३ रोजी सकाळी भक्ती पवार व अंजली काजळकर यांचे गायन, सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, रात्री लक्ष्मीकांत धानोरकर यांची भजन संध्या होणार आहे. २४ रोजी दिनेश संन्यासी यांचे गायन तर रात्री पराग चौधरी (औरंगाबाद) यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. २५ रोजी सकाळी पराग चौधरी यांचे गायन, दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान आनंदी स्वामी भजनी मंडळाचा कार्यक्रम आणि रात्री संजय देशमुख (हिंगोलीकर) यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आनंदवाडी संस्थानचे रामदास आचार्य व भाविकांनी केले आहे.
आजपासून आनंदवाडी श्रीराम मंदिरात उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:44 AM