जाफराबाद : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी ३३५ जणांनी मुंडन करत शासनाचा निषेध केला. हे केस मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तहसीलदार व स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार असून, आज डोक्यावरचे केस देतोय, उद्या रक्त सांडायलाही मागे पुढे पाहणार नाही, अशी संतप्त भावना मुंडन करणाऱ्या समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.
अंतरवाली सराटी येथे मागील पंधरा दिवसापासून मनोज पाटील जरांगे यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यापूर्वीही सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी ४ हजार २५० समाज बांधवांनी मुंडन केले होते.
शासनाने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे., समाजाचा अधिक अंत पाहु नये., अन्यथा यापुढील काळात समाजाच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.