लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्याला चालू वर्षात ३६ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट दिले होते; परंतु आठ महिन्यांत केवळ १५ हजार शौचालयांचीच उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घनसावंगी तालुक्यातील शौचालय अनुदान वाटपाची चौकशी सुरू असून, त्यातूनही अद्याप काहीच हाती आले नसल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे.जालना जिल्हा हा सत्ताधाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातच स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री येथीलच आहेत. असे असतांना स्वच्छ भारत मिशनला केंद्र आणि राज्य सरकारने सर्वात जास्त प्राधान्याने राबविण्याचे निश्चित केले आहे. घर तेथे शौचालय उभारणीसाठी राज्य सरकारने अनुदानही देऊ केले आहे. त्यासाठी १२ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते. हे अभियान २०१४ पासून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गेल्या चार वर्षात बेसलाईन सर्व्हेक्षणानुसार जवळपास एक लाख ७४ हजार शौचालयांची उभारणी पूर्ण झाल्याचे जिल्हा परिषदेतील स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.यंदाच्या वर्षाचे आता केवळ तीनच महिने शिल्लक आहेत. असे असतांना केवळ ५० टक्केच शौचालयांची उभारणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.त्यातही अनेक गांवामध्ये केवळ कागदावरच शौचालय उभारणी सुरू असल्याने मोठा गोंधळ सुरू आहे. घनसावंगी तालुक्यात अनुदान वाटपातही बोगसगिरी झाल्याचे समोर आले असून, त्याच्या चौकशीचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी दिले होते. परंतु ही चौकशी देखील रखडली आहे. विहिरींची चौकशी आयुक्तांकडून करण्यात आली आहे.विहीर वाटपातही गोंधळाची स्थितीमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विशेष करून परतूर तालुक्यात ज्या विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यातही तांत्रिक गडबड झाल्याने तत्कालीन गट विकास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.एकूणच या सर्व प्रकरणांवर जिल्हा परिषदेच्या सभागृहात संबंधित विहीर खोदलेल्या परंतु अनुदान न मिळालेल्या शेतक-यांनी मोठा गोंधळ घातला होता. तसेच परतूर येथील तहसील कार्यालयासमोर चक्री उपोषणही केलेहोते.
शौचालय उभारणी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:57 AM