जालना : शिक्षकाला वरीष्ठ वेतन श्रेणी लागू करून वेतनाच्या फरकाचा लाभ मिळवून देण्यासाठी जालना येथील स्व. राजीव गांधी मुकबधीर निवासी विद्यालयाच्या संस्था अध्यक्षाने ५० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. पैसे आणण्यासाठी आलेल्या शिपायाला ४५ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी बदनापूर येथून ताब्यात घेतले. संशयित संस्थाचालक भास्कर गाडेकर (रा. गीरसगावडी, ता. फुलंबी, जि. औरंगाबाद) हा फरार आहे. तर शिपाई रंजीत प्रताप राठोड (२७ गीरसावडी, ता. फुलंबी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदार हा जालना येथील स्व. राजीव गांधी मुकबधीर निवासी विद्यालयात शिक्षक आहे. शासन नियमाप्रमाणे वरिष्ठ शिक्षक वेतन श्रेणी लागू करण्यासाठी त्यांनी मुख्याध्यापकांना वारंवार विनंती केली. मुख्याध्यापकांनी त्यांना संस्था अध्यक्षास भेटण्यास सांगितले. तक्रारदार हे संस्था अध्यक्षांना भेटण्यासाठी गेले असता, संस्था अध्यक्ष भास्कर गाडेकर म्हणाले की, तुमचे काम करून देतो, तुम्ही शिपायाच्या फोन पे वर ५ हजार रूपये टाका. त्यानंतर तक्रारने शिपायाच्या फोन पेवर ५ हजार रूपये टाकले. परंतु, तरीही संस्था अध्यक्षाने टाळाटाळ केली. व तक्रादारास ५० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा लावून, संस्था चालकास पैसे घेण्यासाठी बदनापूर येथे बोलवले. परंतु, संस्थाचालकाने शिपायाला पैसे घेण्यासाठी पाठविले. ४५ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिपायाला ताब्यात घेतले. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहूल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस निरीक्षक एस. एम. मुटेकर, अंमलदार ज्ञानेश्वर म्हस्के, गजानन घायवट, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, गणेश चेके, गणेश बुजाडे, जावेद शेख, गजानन कांबळे, प्रवीण खंदारे आदींनी केली आहे.