जालना : देवाचे कपडे खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या भामट्याने एका वृद्ध महिलेचे एक लाख ६४ हजार ५०० रूपयांचे दागिने घेवून पळ काढला. ही घटना गुरूवारी सकाळी जालना शहरातील काद्राबाद भागात घडली असून, या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील काद्राबाद भागात माधवी विरेंद्र गुप्ता (७२) यांचे कापड दुकान आहे. माधवी गुप्ता या गुरुवारी सकाळी दुकानात बसल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती देवाचे कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आला. देवाचे कपडे खरेदी करताना सोन्याला स्पर्श करायचा असे सांगितले. त्यामुळे माधवी गुप्ता यांनी कानातील टॉप्स, हातातील दोन कडे, चैन, बालाजीचे पँडल आदी दागिने टेबलावर ठेवले. त्यावेळी गुप्ता यांच्याशी चर्चा करतच त्या भामट्याने एक लाख ६४ हजार ५०० रूपयांचे दागिने घेऊन पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माधवी गुप्ता यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि. सुनील अंबुलकर, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोउपनि. सुग्रीव चाटे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणात माधवी गुप्ता यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. सुग्रीव चाटे हे करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
माधवी गुप्ता यांच्या कापड दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे या कापड दुकानाच्या शेजारी असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संबंधित भामट्याचा शोध सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.