तळणी : मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील काही शेतक-यांनी विदर्भातील लोणार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे ५० लाखांच्या शेत मालाची विक्री केली. व्यापा-याने पैसे थेट खात्यात जमा करतो म्हणून सांगितले. मात्र, आठवडा उलटला तरी पैसे मिळाले नाही, व्यापारीही फोन बंद करून गायब झाला. त्यामुळे शेतक-यांनी बाजार समितीच्या सभापतींकडे फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे.मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरातील शेतकरी विदर्भातील लोणार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेती माल विक्री करतात. दोन आठवड्यांपूर्वी तळणी, देवढाणा, कानडी या गावातील शेतकरी रघुनाथ सरकटे, प्रदीप लाड, राजू सरकटे, हनुमान चंदेल, चरण चव्हाण, जनार्दन गहिलोद, वासुदेव लाड, विठ्ठल वायाळ, विनोद वायाळ, विनोद खंदारे, सोपान वायाळ आदींनी आपली तूर व सोयाबीनची लोणार बाजार समितीमधील आडत व्यापारी योगेश आर. शर्मा यांना विक्री केली. पैसे आरटीजीएसद्वारे थेट खात्यात जमा करतो म्हणून सांगितले. परंतु पैसे न देताच व्यापारी मोबाईल बंद करून फरार झाल्याचे १२ जानेवारी रोजी उघड झाले. फसवणूक झालेल्या लक्षात आल्यानंतर शेतक-यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिव तेजनकर यांच्याकड लेखी तक्रार करीत पैसे मिळवून देण्याची मागणी केली. मात्र, तक्रारीनंतरही ना पैसे मिळाले, ना अडत्यावर कारवाई झाली. शेतीमालास भाव नसतानाही आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी शेतक-यांनी माल विकला खरा पण, अडत्याने पैसे न दिल्याने शेतक-यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. लोणार बाजार समितीचे सचिव रामदास वायाळ यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात शेतक-यांची फसवणूक झाल्याची लेखी तक्रार दिली आहे.---------प्रतिक्रियालोणार बाजार समितीमधील आडत व्यापारी योगेश आर. शर्मा यांच्याकडे तूर व सोयाबीनची आठ जानेवारी रोजी विक्री केली. १० जानेवारीपर्यंत शर्मा यांनी पैसे खात्यावर जमा केले नाहीत. चौकशी केली असता मोबाईल बंद आढळून आला. फसवणूक झालेल्या शेतक-यांनी बाजार समितीचे सभापती शिव तेजनकर यांच्याकडे १५ जानेवारी रोजी लेखी तक्रार केली. मात्र, अद्याप काहीच झाले नाही.- वासुदेव लाड, शेतकरी-----------अडतदार योगेश शर्मा याच्याकडे शेतमाल विकलेल्या शेतक-यांची अंदाजे ६० लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती असून २० लाख रुपयांच्या अडत पावत्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जमा झाल्या आहेत. आर्थिक फसवणूक झालेल्या शेतक-यांनी बाजार समिती सचिवाकडे त्वरित तक्रारी दाखल कराव्यात.-शिव पाटील तेजनकर, सभापती, कृउबा लोणार.----------------सदर प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव फसवणूक झालेल्या शेतक-यांची माहिती मिळवत आहे. या प्रकरणी जिल्हा निबंधकांच्या माध्यमातून गुन्हा नोंदविण्यात येईल.राजेंद्र माळी, पोलीस निरीक्षक, लोणार-------
पन्नास लाखांचा माल घेऊन व्यापारी पसार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:10 AM