जालना / परतूर : प्रतिबंधीत औषधांची नशेसाठी विक्री करणाऱ्या युवकाविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई बुधवारी १० जानेवारी रोजी करण्यात आली असून, यावेळी ७४ हजार ७०९ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबईत फरशी बसविण्यासह इतर व्यवसायाचे काम करताना संबंधित युवकाला नशेसाठी विक्री होणाऱ्या औषधांची माहितीमिळाली होती. त्यावरून त्याने स्वत:च या प्रतिबंधित औषधांची विक्री सुरू केली होती.अब्दुल उर्फ अज्जू अझीझ मोहम्मद बोगदीन (वय-२७ रा. परतूर) असे कारवाई झालेल्या युवकाचे नाव आहे.
परतूर येथील एक युवक अवैधरित्या मानवी आरोग्यास घातक असलेल्या व एनडीपीसी घटक प्रतिबंधीत असलेल्या गुंगीकारक औषधे, गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने बुधवारी परतूर येथे सापळा रचून अब्दुल उर्फ अज्जू अझीझ मोहम्मद बोगदीन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ७४ हजार ७०९ रूपये किंमतीच्या निट्राझेपमच्या ७४०, अल्प्रझाेलमच्या १७०५ गोळ्या आणि कोडीन च्या २४ बॉटल या प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात अन्न औषध निरीक्षक वर्षा महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अब्दुल उर्फ अज्जू अझीझ मोहम्मद बोगदीन विरूद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, राजेंद्र वाघ, सुधीर वाघमारे, रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, विनायक कोकणे, विजय डिक्कर, सतीश श्रीवास, अक्रुर धांडगे, देविदास भोजने, धीरज भोसले, धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे आदींच्या पथकाने केली.
५० ते ५०० रूपयांना विक्रीनिट्राझेपम औषधाची गोळी सात रूपयांना मिळत असून, ती गोळी ५० ते १०० रूपयांना विक्री व्हायची. अल्प्रझाेलमच्या ३ रूपयांच्या गोळीची ५० ते १०० रूपयांना व १४६ रूपयांच्या कोडीन बॉटलची २५० ते ५०० रूपयांनी विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.