तळणी : मंठा तालुक्यातील तळणी पोलीस चौकीअंतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यांना लगाम लावण्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी अपयशी ठरत होते. अवैध धंद्यांच्या तक्रारी प्राप्त होताच पोलीस अधीक्षकांनी तळणी येथील पोलिसांच्या बदल्या केल्या असून, अवैध धंद्यांनाही लगाम लावला आहे.
तळणी पोलीस चौकीअंतर्गत अवैध धंदे वाढू लागले होते. त्यात देशी दारू विक्री, अवैध पेट्रोल- डिसेल विक्री, अवैध गुटका विक्री यासह ऑनलाइन मटका सुरू झाला होता. या अवैध धंद्याविरुद्ध वेळोवेळी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी मंठा पोलीस निरीक्षक विलास निकम यांना अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. पो. नि. निकम यांनी तळणी बीटचे पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार यांना कारवाईचा सूचना दिल्यानंतर तळणीतील अवैध धंद्यांना लगाम लावण्यात आला आहे. दरम्यान, तळणी पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी राजू राठोड व संदीप घोडके यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलीस कर्मचारी दीपक आढे व सुभाष राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कारवाईत सातत्य
तळणी व परिसरातील अवैध धंद्यांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू आहे. यापुढील काळातही अवैध धंदे पूर्णपणे बंद रहावेत, यासाठी प्रयत्न केले जातील.
फौजदार नितीन गट्टूवार
तळणी चौकी