मंठा : मागील एक ते दीड महिन्यापासून तालुक्यात वाळूची वाहतूक सुरू असून, वाळू वाहतूक करणाऱ्यांसाठी विनानंबर प्लेटच्या गाड्या वापरल्या जात असल्याचे समोर आले आहे. याकडे प्रादेशिक परिवहनचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने मागील दोन वर्षांपासून मंठा तालुक्यात वाळूचे लिलाव केले नव्हते. परंतु, लिलाव नसतानासुद्धा पूर्णा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन केले जात होते. हे वाळू तस्कर जास्तीच्या दराने १० ते १२ हजार रुपये ब्रासने वाळूची विक्री करीत होते. त्यामुळे वाळूचे लिलाव करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने दखल घेऊन काही दिवसांपूर्वीच वाळूचे लिलाव केले आहे. त्यामुळे एक ब्रास वाळूची वाहतूक करण्यासाठी ४,५०० रुपयांची पावती असल्याचे सांगण्यात येते, तर मग ३,००० ते ३,५०० रुपये भावाप्रमाणे मंठा शहरात वाळूची विक्री कशी काय केली जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कमी दराने वाळूची विक्री का केली जात आहे, हे गुपित कोणाला कळेनासे झाले आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे वाळू तस्कर एकाच पावतीवर दिवसभर सहा ते सात टिपर वाळूची वाहतूक करत असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, मंठा तालुक्यात विनानंबरच्या वाहनातून वाळू वाहतूक केली जात असल्याचे वृत्त लोकमतने काही दिवसांपूर्वीच प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली होती.