दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेली १०८ अॅम्ब्युलन्स सेवा रुग्णांना जीवनदायी ठरताना दिसत आहे. या मोफत सेवेअंतर्गत मागील पाच वर्षात जिल्हाभरातील तब्बल ५५ हजार ७४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर यात १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचविल्याची माहिती जिल्हा रुग्णांलयाच्यावतीने देण्यात आली.अपघातात जखमी झालेले व इतर रुग्णांना त्वरीत उपचार मिळावे, यासाठी सरकारतर्फे २०१४ साली मोफत अॅम्ब्युलन्स सेवा सुरु करण्यात आली. यात डॉक्टर असल्याने रुग्णवाहिकेमध्ये रुग्णावर उपचार करण्यात येतात. गरज पडल्यास त्या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते. या मोफत रुग्णवाहिकेचा रुग्णांना फायदा होत असून, जालना जिल्ह्यातही याचा फायदा होत आहे. मागील पाच वर्षात जिल्ह्यातील ५५ हजार ७४६ रुग्णांवर या अतंर्गत उपचार करण्यात आले, तर १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. यात २०१४ साली ४ हजार ९५७, २०१५ साली ८ हजार ३९५, २०१६ साली १३ हजार २९०, २०१७ साली १९ हजार ५५३, तसेच २०१८ साली ९ हजार ५५१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. जिल्ह्यासाठी १५ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. यावर दररोज जवळपास ४० ते ५० कॉल येतात. यातील प्रत्येक रुग्णवाहिकेला दररोज दोन रुग्णांना आणावे लागते. यामुळे ही रुग्णावाहिका जिल्ह्यातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहेत.
५५ हजार ७४६ जणांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 1:03 AM