लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजकारणात राहूनही अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी, अमोघ वक्तृत्व यामुळे भारतीय जनता पक्षाची मुलख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेल्या भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने एक सुसंस्कृत राजकारणी महिला काळाच्या पडद्याआड गेली आहे.भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्व. इंदिरा गांधीनंतर स्वराज यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या जाण्याने भाजपसह भारतीय राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा आपण नेहमीच चाहता होतो.- राजेश राऊत, उपनगराध्यक्षसुषमा स्वराज आणि माझा संबंध हा गेल्या तीस वर्षापासूनचा होता. या तीस वर्षाच्या काळात त्यांच्याकडून अनेक महत्त्वाच्या बाबी शिकण्यास मिळाल्या. राजकारण करत असतानाच त्या अत्यंत भावूक व्यक्ती म्हणूनही परिचित होत्या. विरोधकांवर तुटून पडताना त्यांनी सत्याची बाजू कधी सोडली नाही. परराष्ट्र मंत्री असताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी देशाचे नाव जगभर उंचावले. - रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्रीपक्षात काम करत असताना दिल्ली, मुंबई येथे जाण्याचे योग आले होते. या भेटी दरम्यान त्यांच्याशी तीस वर्षापूर्वीच ओळख झाली होती. त्यांच्यासमोर आम्ही नवखे होतो. परंतु त्यांनी आम्हाला त्याची जाणीव कधी होऊ दिली नाही. सुषमा स्वराज यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे मोठा हिरा गमावला आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून न निघणारी आहे.- बबनराव लोणीकर, पालकमंत्रीसुषमा स्वराज यांचा आपल्यावरचा प्रभाव हा खूप जुना आहे. आपण महाविद्यालयात असताना त्यांना जालन्यात एका कार्यक्रमासाठी बोलाविले होते. एकूणच त्यांचे साधे परंतु तेवढेच प्रभावी व्यक्तिमत्त्व नागरिकांवर छाप पाडून जात असे. कुठल्याही मुद्याचा अभ्यास करून त्यावर थेट चर्चा करण्याची त्यांची तयारी असे. मुळात एक विधिज्ञ असल्याने दोन्ही बाजू ऐकून घेण्याची त्यांची खुबी होती. - अर्जुन खोतकर, राज्यमंत्रीआपण शिवसेनेत असलो तरी सुषमा स्वराज या आपल्या आवडत्या नेत्या होत्या. त्यांचे संसदेतील आणि प्रचार सभा दरम्यानच्या भाषणांना आपण आवर्जून अभ्यासले आहे. महाविद्यालयीन जीवनात त्या जालन्यात आल्या असतानाच्या आठवणी त्यांच्या जाण्याने आजही ताज्या झाल्या आहेत. राजकारण करताना महिलांनी न्यूनगंड न बाळगता धडाडीने केले पाहिजे, अशी त्यांची नेहमीच अपेक्षा राहिली होती. - भास्कर अंबेकर, माजी नगराध्यक्ष
संस्कृती जपणाऱ्या सुषमा स्वराज यांना जालन्यात मान्यवरांकडून श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:46 AM