गोलापांगरी : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका ट्रकने बसला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरूवारी सकाळी जालना- अंबड मार्गावरील गोलापांगरी पाटीजवळ घडली. या अपघातात ट्रकचा चालकही जखमी झाला आहे.
राज्य परिवहन महामंडळाची एक बस (क्र.एम.एच.१४- बी.टी.२१९१) प्रवासी घेऊन गुरूवारी सकाळी अंबडकडून जालन्याकडे जात होती. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (क्र.एम.एच. ०४- जे.के. २५६३) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर, बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. तर सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गोलापांगरी येथील रोडवर गतिरोधक नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. या मार्गावरील वाहनांची वर्दळ आणि वाढलेले अपघात रोखण्यासाठी रस्ता दुभाजकासह गतिरोधकाची निर्मिती करावी, रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
फोटो