गेल्यावर्षी याच काळात लॉकडाऊन होता आणि सलग दुसऱ्या वर्षी तीच स्थिती असल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.
आज अनेक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार तसेच कारागीर आहेत. या सर्वांना वेतन द्यावेच लागते; परंतु आता तर वेतन देण्याची ऐपत नसल्याने व्यापारी अडचणीत आहेत. तर कारागिरांची देखील मोठी निराशा होत आहे. अक्षय तृतीया म्हटले की, सराफा बाजारात सर्वाधिक वर्दळ असते. कोट्यवधीचे सोने-चांदी खरेदीचे व्यवहार होतात; परंतु यंदा बाजारच बंद असल्याने या उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.
चौकट
वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल
सलग दुसऱ्या वर्षी मोठे मुहूर्त हुकले आहेत. त्यामुळे सर्वांत जास्त फटका सराफा बाजाराला बसला आहे. आज अक्षय तृतीया हीदेखील सुनीसुनीच गेली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात एक हजाराने वाढ झाली आहे. मध्यंतरी हेच सोने ५५ हजार रुपयांवर पोहोचले होते. त्या तुलनेने हे दर सहा हजार रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूकदारही अडचणीत सापडले असून, किरकोळ ग्राहक येऊ शकले नाहीत.
-प्रफुल्ल गिंदोडीया, सराफा व्यावसायिक
---------------------------------------------
रिअल इस्टेटमध्येही कोरोना इफेक्ट
कोरोनामुळे सर्व जण आरोग्य चांगले राहण्यासह आरोग्यविषयक क्षेत्रात अधिकचा पैसा गुंतवीत आहेत. आज अनेकांना स्वत:चे घर घेण्याची इच्छा आहे; परंतु प्राधान्य द्यावे कशाला, या द्विधा मन:स्थितीत नागरिक आहेत. पाडवा, अक्षय तृतीया घर, प्लॉट बुकिंगसाठी मोठा मुहूर्त असतो; परंतु यंदा एकाद -दुसरी इक्वायरी आली आहे.
-अभय कुलकर्णी, बांधकाम व्यावयायिक, जालना
-----------------------------------------------------------------
ऑनलाइन तंत्राचा चांगला परिणाम
आजचे युग हे तंत्रस्नेही युग म्हणून ओळखले जात आहे. जवळपास प्रत्येक गोष्ट ही आता ऑनलाइन मागविता येते. त्यामुळे कोरोनाचे निकष पाळून आम्हीदेखील ग्राहकांना नवनवीन डिझाइन सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या मागणीनुसार ते बनवून दिले. तसेच काहींनी आधीच बुकिंग करून घडनावळ केलेले दागिने शुक्रवारी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी घेऊन गेल्याने किमान मुहूर्ताला काहीच नाही, असे न झाल्याचे समाधान म्हणावे लागेल.
-भरत गादिया, सराफा व्यावसायिक, जालना