लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव राजा : बालाजी मूर्तीचा पालखी सोहळा सोमवारी मध्यरात्री काढण्यात आला होता. हा सोहळा तब्बल वीस तास रंगला असून, शेकडो भाविक- भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले.देऊळगाव राजा शहरातील बालाजी महाराज हे विदर्भाचे प्रति तिरूपती बालाजी म्हणून ओळखले जातात. माँ जिजाऊ यांच्या पावन भूमीतील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. माँ जिजाऊंचे वडील राजे लखोजीराव जाधव यांच्या काळामध्ये देऊळगाव राजा शहरातील श्री. बालाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली होती. यानंतर विविध सण, उत्सव, यात्रा या माध्यमातून श्री बालाजी महाराज यांची यात्रा दरवर्षी भरविली जाते, घटस्थापनेपासून देऊळगाव राजा शहराच्या या श्रींच्या यात्रेला सुरुवात होते. यामध्ये घटस्थापना झाल्यानंतर लाटा मंडप उत्सव साजरा होतो. सोमवारी मध्यरात्री मुख्य गाभाऱ्यातून श्रींची मूर्ती बाहेर काढण्यात आली. यानंतर पालखी सजवून हा पालखी सोहळा सुरू करण्यात आला.यामध्ये भाविक- भक्तांनी पालखीच्या आतमध्ये असलेल्या श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीला स्पर्श करून दर्शनाचा लाभ घेतला. केवळ वर्षातून एकदाच प्रत्यक्ष मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याचा लाभ मिळत असल्याने भक्तांची मांदियाळी पाहावयास मिळाली. पालखी मार्गक्रमण रस्त्यावर ३० ते ४० ठिकाणी भक्तजनांना दर्शनासाठी पालखी ठेवण्यात आली. यावेळी भक्तजन रांगोळी आणि फुलांची सजावट करून श्रींच्या दर्शनासाठी पालखी थांब्यावर उपस्थित राहिले होते. तब्बल वीस तासानंतर पालखी श्रींच्या मंदिरामध्ये नेण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी भीमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संभाजी पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
वीस तास रंगला बालाजींचा पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 1:18 AM