तळणी : शेगाव- पंढरपूर या दिंडी महामार्गावरील तळणीनजीक अचानक रस्त्यावर दगडे ठेवून रस्ता बंद करण्यात आला होता. याची कल्पना कारचालकांना आली नसल्याने दोन कारचा अपघात झाला. यात दोनही कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता तळणी येथील सरकटे सर्व्हिंग सेंटरजवळ घडली.
मंठा शहराकडून रात्री कार (क्र.एम.एच. १५, सीएम. ७०६३) ही भरधाव येत होती. यावेळी रस्त्यावर असलेले दगडे चुकविण्याच्या नादात कार दुभाजकावर आदळली. याचवेळी लोणारकडून येणारी कार (क्र.एम.एच १२, एनएक्स ३३९९) ही समोरच्या नाल्यात पडली. यात दोन्ही कारचे मोठे नुकसान असून एक महिला जखमी झाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
दिंडी महामार्गावर अनेक कामे सुरू आहेत. मात्र, अचानक रस्त्यावर दगड ठेवून रस्ता बंद करणे, रस्ता खोदून ठेवणे, रस्त्यावर मुरूम, खड्डीचा गंज टाकणे आदी प्रकार बिनधास्तपणे कंपनीकडून केले जातात. अशा ठिकाणी सूचना फलकही नसते. त्यामुळे रात्रीच्यावेळी अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यापूर्वीही याच रस्त्यावर एकाला जीव गमवावा लागला आहे.
कंपनीविरुद्ध रोष
अजिसपूर- तळणी- गारटेकी- नायगाव- ठोकसाळ- पिंपरखेड- तळणी फाटा मंठा या दिंडी महामार्गावरील सिमेंट रस्ता, पुलाची कामे, पुलाजवळील भराव, नाली बांधकाम, डिव्हाईडर, पेवर ब्लॉक, पथदिवे यांसह अनेक कामे निकृष्ट दर्जांची होत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याऱ्या एमएसआरडीसीचे दुर्लक्ष होत असून, याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे यांनी केली आहे.
कामाची चौकशी होणार
तळणी ते मंठादरम्यान असलेल्या दिंडी महामार्गावरील कामांबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. या सर्व कामांची चौकशी होणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांनी दिली.